Tuesday, July 26, 2011

टूर निघाली स्कॉटलंडला-2


बुधवार सकाळ १३ तारीख!

आम्ही दोघींनी लवकर उठून आवरून घेतले. किटलीत पाणी गरम करून घेऊन चहा करून घेतला. सवय चहा ची. तोवर आवरून एकेक जण तयार झाले. अक्षरा सर्वात लहान म्हणजे १० महिन्याची.पण ती लवकर उठून आवरून फिरायला तय्यार. इकडच्या पद्धतीप्रमाणे आम्ही पोटभर नाश्ता करायला त्या लॉजच्याच हॉटेल [लिटील शेफ नावाचे] मध्ये गेलो. तिकडच्या पद्धती शिष्टाचार सांगते....खूप खुर्च्या खाली होत्या पण आपण लगेच आत जाऊन बसायचे नाही.गेट वर उभे राहायचे, मग तिकडचा वेटर कमशेफ येणार विचारणार, सांगणार त्या ठिकाणीच आपण बसायचे. सर्व अगदी निवांत..इतक्या वेळात आपल्या कडे हॉटेल मध्ये माणूस खाऊन बिल देवून बाहेर पडेल. नंतर तो शांतपणे त्याच्या मर्जीनुसार येवून आपल्याला विचारणार. मगच आपण ऑर्डर करायचे. तोच जाऊन तयार करणार त्या मुळे परत निवांत गप्पा मारत बसायचे. इकडे माणूस बळ एकदम कमी. कामगार नाहीतच. त्या मुळे कितीही घाई असली, भूक लागली असली तरी शांतपणे थांबायची मनाची तयारी ठेवावी लागते.

पोटभर खाऊन अनिकेत आणि अमोल दुसरी गाडी बदलून आणायला गेले. गाडीत परत सर्व सामान भरले आणि आम्ही तिकडून "इंव्हुर्नेस" ला जायला निघालो, पण अॅबर्दीनच्या मार्गाने. अंतर जवळ जवळ ४ तास होते. मध्ये थांबत जात होतो. गाडीत गप्पा गाणी ऐकणे, अक्षराशी खेळणे सुरु होते.त्याही पेक्षा बाहेरचे निसर्ग सौंदर्य पाहण्यात सर्व मग्न होते.तिकडे जाताना रस्त्यावर खूप डिस्टीलरीज   दिस्त्लारी लागत होत्या. इतके दिवस आपण ज्या  ब्रॅन्डची व्हिस्की पितो, ती इकडे बनते वा तयार होते, हे बघून दोघेही-अनिकेत  अमोल-खूप खुश होते. खूप उत्सुक होते व्हिस्की टूर करायला. टॉम टॉम, म्हणजे आमचा बोलका बाहुला, आम्हाला रस्ता दाखवत होता. आम्ही जात होतो. 

आम्ही आधी अॅबर्दीनला पोचलो. जवळ-जवळ २ वजता. प्रथम कार पार्किंगची सोय पहिली. नंतर हॉटेलमध्ये जेवायला गेलो.त्याच वेळी आम्हाला मोबाईल बरून मुंबईत बॉम्ब स्फोट झाल्याची खबर मिळाली. काळजीला सुरवात झाली. पण तितक्यात भाग्यश्रीचा मेसेज आला कि आम्ही सर्व सुखरूप आहोत. लगेच सुशीलचा पण फोन आला. जरा हायसे वाटले. मोबाईल आणि इंटरनेटने खरच जग जवळ आले आहे. नाहीतर आम्ही एका टोकावर इकडचे......काहीच लगेच कळले नसते. मागील बॉम्ब स्फोटची आठवण लगेच झाली. अतिरेकी कारवाया करत आहेत. आणि आपण सामान्य माणसे तसेच जीवन जगत आहोत..याची खंत वाटत होती पण काय करणार?????????

जेवताना समोर विशाल दक्षिण महासागर दिसत होता. त्या मुळे लहान मुलांप्रमाणे माझे जेवणाकडे लक्ष नव्हते. अखेर जेवून आम्ही किनार्यावर गेलो फिरायला.पाणी बर्फासारखे थंड होते. पण मी थोडा वेळ तरी पाय बुडवून पाण्यात उभी राहिलेच.पाणी निळेशार स्वच्छ आणि नितळ होते पण कमालीचे थंड. इकडची युरोपियन माणसे आणि मुले मात्र बिनधास्त पाण्यात खेळत होती.जरा वेळ किनार्यावर बसलो,फोटो काढले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. आता आम्हाला इकडून "बिउलीला" [इंव्हुर्नेस, या सिटी जवळचे एक खेडेगाव] जायचे होते. तिकडचे २ दिवसाचे बी अॅन्ड बी, म्हणजे बेड अॅन्ड ब्रेकफास्ट चे आरक्षण केलेले होते. ते अगदी छोटेसे टुमदार खेडे गाव होते. जाताना वाटेत एक स्ट्रॉबेरी फार्म लागला. उद्या सकाळी तो बघायला जायचे लगेच ठरवून टाकले.

बिउलीला जातांना 
बिउलीलचं बी अॅन्ड बी म्हणजे एका युरोपियन माणसाचे घर,त्यांनी घरातच लोजिंग सुरु केले होते. बाहेरून आम्हाला आत इतके मोठे व सुसज्ज असेल असा अंदाज आला नाही.पण आत जाऊन तो अनुभव घेतला.या बी अॅन्ड बी मध्ये आमचा २ दिवस मुक्काम होता. खोल्यातून सामान नेऊन ठेवले. शेजारीच एक "बिउली तंदुरी" हे भारतीय हॉटेल होते. तिकडे गेलो. रात्रीचे १० वाजायला आले होते.तो मालक हॉटेल बंद करण्याच्या तयारीत होता. त्या मुळे आम्हाला अगदी कसे बसे जेवायला मिळाले. जेवून रात्री ११.३० वाजता लॉज वर परतलो. तोवर सूर्यास्त झाला नव्हता. आणि परत सकाळी ३.३०लाच सूर्योदय झाला. बाप रे! किती मोठा दिवस......

बिउली गाव
सकाळी आवरल्यावर त्या ठिकाणी राहणाऱ्या युरोपियन जोडप्यांनी आमची नाश्ताची सोय छान ठेवली होती. दोघेही बोलायला खूप चांगले होते. त्याचे नाव इयान होते. भक्कम शरीरयष्टी असलेले,गोरापान इयान होता. तोच काय हवे ते विचारणार आणून देणार. त्याची बायको आत नाश्ता बनवून देत असे. इकडे हा बरेच जण व्यवसाय करतात. खूप ठिकाणी बेड आणि ब्रेकफास्टचे बोर्ड पाहिले. फक्त समर मध्ये ४ महिने हा व्यवसाय. विंटर मध्ये खूप इकडे बर्फ पडतो त्या मुळे सर्व बंद...दोघेही खूप अगत्याने सर्वांशी बोलायचे, त्यांनी २ दिवस घरगुती वातावरणात मजेत गेले. गम्मत सांगते सकाळी नाश्ता देण्यापासून बिल देणे ते रात्री बार मध्ये ग्लास भरून देणे सर्व काम तो एकटा इयान करत असे अंदाजे वय ६५ ते ७०. काय कमाल आहे ना!आणि ती सर्व कामे ती अगदी मजेत  हौशीने.

टूर निघाली स्कॉटलंडला-1

ज मंगळवार १२.७ २०११! 


आज आम्ही सहलीला जायचे ठरले होते. २ दिवस माझी तयारी सुरु होती. नेहमी प्रमाणे वाटेत खायला काहीतरी हवे म्हणून मका आणि पोहे यांचा चिवडा करून घेतला. गोड काहीतरी हवे म्हणून नंदिनीच्या आवडीची गुळ पापडीची वडी करून घेतली.कपडे आणि इतर सामान खूप बॅगेत भरले होते.आम्ही रात्री ७.३० च्या विमानाने [इझी जेट]जाणार होतो. या लोकल विमान सेवेत सामानाचे वेगळे पैसे भरावे लागतात. एका २० किलोच्या बॅगेत आमचे तिघांचे कपडे राहणे शक्य नव्हते. अखेर केबिन बेग  स्वतंत्र भरली. सर्व तयारी करून निघालो. अनिकेतने घरी टॅक्सी  मागवली होतीच. त्यामुळे सुखाने विमान तळावर पोचलो. तिकडे मंजिरी,अश्विनी,अमोल आणि अक्षरा आधीच आले होते. आम्ही सर्व सोपस्कार करून आरामात जरा वेळ गप्पा मारत बसलो. ठीक ७.३० वाजता विमानाने उड्डाण केले.एकच तासाचा प्रवास होता.पण सहलीत लगेच खायला हवेच हा अलिखित नियम.....प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार खायला प्यायला घेतले. सर्व पैसे भरून. [पैसे नाही पौंड भरून]या प्रवासात विमान कंपनी कडून काहीच फुकट मिळत नाही.

अक्षराचा हा पहिलाच विमान प्रवास होता. सर्वांचे लक्ष त्या मुळे तिच्याकडे जास्त होते.तिचे मात्र इतरांकडे जास्त होते.खूप लोक दिसत होते ती खुश होती. प्रवासाचा तिने खरच लहान वयात आनंद लुटला.विमानातून उतरल्यावर सामान घेतले,आणि बाहेर पडलो. तिकडे जवळच "एंटरप्राइस कार रेंटल", या कंपनीचे कार्यालय होते. अनिकेतने आधीच ऑन लाईन ७ जागा असलेली गाडी आरक्षित करून ठेवली होती. 


इकडे भाडे तत्वावर गाड्या मिळतात. त्या ठिकाणी गेल्यावर गाडी बघून आम्ही सर्व विचारात पडलो. करण आमचे सामान खूप होते. गाडीत राहणे शक्य नव्हते.सुमारे एक तास सामान आणि लोक कसे बसवायचे ते ठरत नव्हते. अखेर अनिकेत ने २ ट्रिप करून आम्हाला लॉज वर नेले. एडिनबराचं [आपलं एडिनबर्घ]  लॉज पण प्रशस्त होतं. खोल्या छान नीटनेटक्या होत्या. स्वच्छ तर खूपच. तिकडे पण एक भारतीय काम करत होता.

या ठिकणी पण रात्री १० नंतर काही मिळत नाही,म्हणून अश्विनीने लगेच पिझ्झा मागवून ठेवला. जरा असा तसाच होता. पण भूक लागली होती त्यामुळे सर्वांनी मुकाट्याने खाल्ला. आता सर्वांनाच नामांकित कंपनीचा पिझ्झा खायची सवय झाली आहे.रात्री खाऊन गप्पा मारून, उद्या कुठे, किती वाजता जायचे ते ठरवून प्रत्येक जण आपापल्या खोलीत झोपायला गेले.मी आणि मंजिरी खूप दिवसांनी असे बाहेर एकत्र राहायला होतो.खूप वेळ गप्पा मारून खूप उशिरा झोपलो.

Monday, June 20, 2011

विंडसर आणि रोमन बाथ--रोमन बाथ ते इंडियन चायनिझ

प्रथम अनिकेतने त्या गाडीच्या एजन्सिला फोन केला आणि थोड्याच वेळात तिकडचा एक मेकॅनिक हजर झाला. गाडी बघून दुरुस्ती थोडीशी करून गेला. आवाज येणे बंद झाले. त्या मुळे परतीच्या प्रवासात टेन्शन नव्हते.

रोमन बाथ मध्ये जुन्या पुरातन वस्तू खूप आहेत. अजूनही इतक्या थंड हवेत त्या ठिकाणी कुंडाचे पाणी कोमट आहे.पण त्या ठिकाणी जे गार पाण्याचे कुंड आहे ते मात्र नीट नव्हते. म्हणजे पाणी सर्व हिरवेगार झाले होते. नाव ठेवायला तेवढेच.....पण त्या बाथ च्या ३ माजली इमारतीमध्ये जागोजागी पडद्यावर त्या काळचा इतिहास दाखवला जात होता. कथा चित्रित केल्या होत्या.

एक जागा अशी होती कि तिथे मोठे पाण्याचे कुंड होते, त्यात लोकांनी खूप नाणी टाकली होती. आपल्याकडे गंगेत टाकतात तशी. पण या वरून ते पण श्रद्धाळू आहेत हे जाणवले. आपल्या मनातील इच्छा बोलून नाणे पाण्यात टाकतात.हे प्रत्यक्ष पाहिले. आपल्याकडचा नवस किंवा कौल ....पण कोणीही इतकी नाणी समोर पडलेली दिसत असताना पाण्यात उतरत नव्हते. हे विशेष दिसले. खरच इकडे गरिबी बेकारीनाहीच का? प्रश्न पडला.

बाथ संपूर्ण फिरून आम्ही बाहेर पडलो, आता मत्र थकायला झाले होते. मस्त एक कॅटबरी घेतली. गाडीत बसलो. कॅटबरी खाल्ल्यावर जरा एनर्जी वाटली. त्या नंतर परतीचा प्रवास सुरु. आता गाडी ओके होती. घरी परत जाताना अजून एक ठिकाण बघायचे होते ते म्हणजे हाउन्सलो. हाउन्सलो म्हणजे लंडन मधील एक भाग. अनिकेतचे जुने घर आणि त्या ठिकाणी असलेली सर्व इंडियन वस्ती. दुकाने हॉटेल. रात्री जेवायचं इंडियन हॉटेल मध्ये हे नक्की होते.

आम्ही हाउन्सलो मध्ये पोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. बरीच दुकाने बंद झाली होती. पार्किंग मध्ये गाडी लावली.समोर अॅस्डा होते. अॅस्डा म्हणजे आपल्या कडील बिग बझार.पण मोठ्या प्रमाणात.त्या ठिकाणी गेलो.

दुध, भाज्या, फळे व इतर सामान घेतले,गाडीत टाकले.त्या नंतर चालत चालत फिरायला सुरवात. त्या भागाची माहिती दोघे मला देत होते त्यांच्या पद्धतीने. म्हणजे अनिकेतच्या भाषेत हा रोड म्हणजे आई इकडचा लक्ष्मी रोड.

नंतर एका खास मराठी मुलाचे हॉटेल, श्री कृष्ण वडा पाव सेंटर, या ठिकाणी मोर्चा वळवला.पण त्या जागी ते दुकान नव्हतेच. शोध सुरु. फिरत फिरता सापडले. धन्य झालो! त्या दुकानात जाऊन अगदी आपल्या पद्धतीचा चहा आणि वडा पाव घेतला. मस्त कडक चहा पिऊन तरतरी आली आणि चक्क तो मुलगा मराठीत बोलत होता! खरच त्या मुळे इतके बरे वाटले. बाहेर गेलो कि आपल्या भाषेची किंमत कळते.त्याच्या कडे आपल्या सणानुसार पदार्थ मिळतात,लगेच नंदिनी ने माहिती दिली.सांगितले आई,संक्रांतीला आम्ही गुळाची पोळी याच्या कडेच खाल्ली.खरच लंडन सारख्या ठिकाणी एका मराठी मुलाने असे दुकान[हॉटेल]चालवायचे,कौतुक वाटले.

त्या नंतर परत चालत चालत आम्ही फ्लेवर्स ऑफ इंडिया, या इंडियन हॉटेल मध्ये गेलो. जरा विसावलो. ते हॉटेल म्हणजे आपल्या कडील अर्बन तडका...तसेच आतील डेकोरेशन होते. इकडे मात्र खास पंजाबी चायनीज चमचमीत मिळत होते. इकडे युरोपात हॉटेल मध्ये गेलो तर काहीच मसालेदार मिळत नाही.गोरे लोक अगदी फिके जेवण जेवतात.वडा पाव खाल्याने भूक थोडीच होती.पण बिअरच्या बरोबर चिकन लोलीपोप विथ शेझवॉन सॉस [आपल्याकडची लाल जर्द शेझवॉन चटणी] आणि व्हेज क्रिस्पी वर आम्ही ताव मारला. खूप टेस्टी होते सर्व! नंतर न जेवता कुल्फी, गुलाबजाम घेतला. मस्त पोटभर जेवून बाहेर पडलो.

बाहेर गारठा चांगलाच वाढला होता. मी तर कुडकुडत गाडीत जाऊन बसले. आता मात्र गाडीत मागील सीटवर पाय वर घेऊन बसले,कारण पाय आता बोलू लागले होते.एक तासाने आम्ही घरी पोचलो.मी लगेच आवरून झोपणे पसंद केले.तिने लगेच फोटो अपलोड केले. सकाळी उठ्ल्यावर लगेच मी फोटो पाहिले, आणि मैत्रिणिंना पाठवले.

आज रविवार सुट्टी. आराम करायचे कालच नक्की झाले.माझा आज चतुर्थीचा उपास .थोडे फराळाचे केले,आणि दिवसभर आराम व ऑनलाईन गप्पा मारल्या. सुशील चा आज वाढदिवस असल्याने त्याला फोन केला.आरामात दिवस घालवला......

विंडसर आणि रोमन बाथ--राजवाडा, स्टोनहेंजची झलक आणि बाथ

त्या नंतर राजवाड्यातील एकेक खोली म्हणजे प्रशस्त दालने बघायला सुरवात केली. मला स्वतःला सर्व राजवाडा आवडला पण विशेष आवडली ती सर्व हत्यारे ठेवलेली दालने. त्या काळची सर्व शस्त्रस्त्रे इतकी सुबक मांडणी करून ठेवली आहेत.ते बघून थक्क झाले.प्रत्यक्षात किती हत्यारे त्या काळी त्यांच्या कडे होती,याची ती एक झलक होती.

राणीचा दरबार, शयन गृह, सल्ला मसलत करायची खोली त्या ठिकाणी प्रत्येक वस्तू वर केलेली कलाकुसर पाहून मन प्रसन्न झाले. राणीला कलेची किती कदर होती हे जाणवले. प्रत्येक वेळी खरच तिची निवड अप्रतिम आहे हे जाणवत होते. इतकी वर्ष झाली तरी त्या सरकारने त्या सर्व गोष्टी इतक्या छान जतन करून ठेवल्या आहेत याचे खूप कौतुक वाटले. प्रशस्त डायनिंग रूम आणि टेबल पाहून त्या काळी एकत्र कुटुंब पद्धती किती सुखद होती, हे जाणवले. तिकडे जे सिक्युरिटी गार्ड [सुरक्षा रक्षक] आहेत त्यांची ड्युटी बदलतानाची [चेंज ऑफ गार्ड] परेड पाहिली.

किती तरी वर्ष झाली, सुरक्षेची नवीन साधने आली.पण त्यांची ती शिस्त, कवायत, त्यांचे ते त्या काळचे पोशाख, सतत दक्ष राहणारे ते गार्ड बघून थक्क झाले. हे सर्व आहे तसे सुरक्षित त्यांच्या मुळेच टिकून आहे याची खात्री पटली.संपूर्ण राजवाड्याभोवती संरक्षक भिंत आहे,मोठमोठे बुरुज आहेत.आणि ते सर्व सुस्थितीत आहे हे विशेष..हे सर्व टिकवायला त्यांनी प्रवेश फी हजार रुपयाच्या वर प्रत्येकी घेतली त्याचे काही वाटले नाही.आपल्या कडे फंड [पैसा] कमी पडतो हे नक्की.....

परतताना आम्ही जॉर्ज चापेल बघायला शिरलो. ते म्हणजे त्यांचे प्रार्थना स्थळ [मंदिर]. त्या ठिकाणी काही विशिष्ट लोकांच्या कबर आहेत.विशेष म्हणजे नुसते कबरीवर [थडग्यावर] नाव नाही तर त्यांचा संगमरवरी आडवा पुतळा आहे.त्या ठिकाणी कमालीची शांतता होती. खरच मला सुद्धा ५ मिनिटे शांत मन एकाग्र करून तिकडे बसावेसे वाटले.आसन व्यवस्था पण उत्तम.

युरोपियन लोकांच्या प्रेक्षणीय ठिकाणाची खासियत म्हणजे आपण ज्या दालनातून बाहेर पडतो तो मार्ग चक्क दुकानात जातो.तुम्ही त्या ठिकाणी जाऊन वस्तू बघून खरेदी करूनच बाहेर पडता. दुसरी खासियत म्हणजे खायला हॉटेल शिवाय बाहेर काही मिळणार नाही. आणि कमालीचे क्लीन. राजवाडा मी प्रथमच पाहीला होता त्याने मी खूप खुश होते. बाहेर पडल्यावर फोटो काढले. जरा फ्रेश झालो. आणि मग गाडीत बसलो.

आता मात्र भूक चांगलीच लागली होती.अनिकेत ने मॅक डोनाल्डचे पार्सल घेतले होते आणि घरातील खाऊ [लाडू,पराठे] पण पॅक केला होता. गाडी गावातून बाहेर पडल्यावर लगेच गाडीत खायला सुरवात केली. इकडे वाहतूक अगदी शिस्तीत असल्याने अनिकेतला गाडी चालवताना डाव्या हाताने खाता येत होते. युरोपियन पद्धती प्रमाणे आम्ही पण खाताना कोक घेणे पसंद केले. रस्त्यात दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, निसर्ग सौंदर्य छान दिसत होते. इकडे कुठेच उजाड माळरान नाही, कि झोपड्या, नाले, घाण नाही. खात पीत गप्पा मारत आम्ही एक तासाने स्टोनहेंजला पोचलो.पोस्ट कोड टाकल्याने आमचा बोलका बाहुला रस्ता अचूक दाखवत होता.

अनिकेतच्या मित्रांनी आधीच सांगून ठेवले होते त्या मुळे आम्ही ते एकावर एक ठेवलेले दगड बाहेरून बघणे पसंद केले, नंदिनी ने जाऊन बाहेरून फोटो अगदी सर्व दिशेने काढले. मी अनिकेत ने गाडीतूनच बघितले. मला अजून त्या दगडचा इतिहास समजला नाही पण गूगल वर शोधून नक्की सांगेन. तसे आम्ही तेथून लगेच निघालो.

पुढे बाथ ला जायचे होते. बाथ म्हणजे रोमन काळातील गरम व गार पाण्याची कुंडे. बाथला जायला २ तास लागणार होते. वाटेत मुसळधार पाऊस पडत होता. मी मागे बसून अनिकेतला सतत सूचना देत होते. सर्वच वाहने कमी वेगात जात होती. तिकडे एक चांगले असते कोणी कुणाला ओवर टेक करत नाहीत. जाताना मधेच आमच्या गाडीतून आवाज येवू लागला.आम्ही तिघे थोडेसे काळजी करू लागलो.वाटेत कुठेही एकही दुरुस्ती चे दुकान नाही.पण आम्ही सुखरूप बाथला पोचलो.

विंडसर आणि रोमन बाथ--क्वीन मेरीचे डॉल हाउस

शनिवार सकाळ लवकरच उजाडली.आम्हाला आज फिरायला बाहेर जायचे होते.सकाळी लवकर म्हणजे ८.३० वाजता बाहेर पडायचे असा बेत ठरला होता.मी सकाळी लवकर उठून माझे आवरून घेतले.चहा करून अनिकेतला उठवले. मग त्यांची आवराआवर सुरु झाली.माझी कामे मी उरकून घेतली.आज हवा खूपच खराब होती,मधेच मळभ येत होते,वारा खूप होता,पाऊस पडत होता.पण अरी आम्ही तसे बरेच वेळेवर निघालो.

गाडीत खायला प्यायला भरपूर घेतले होते.प्रथम निघालो विंडसर कासलला जायला. गाडीत बसल्या बसल्या Tomtom सुरु केलं. त्यात पोस्ट कोड टाकल्यावर त्या मेडम [Tomtom ] रस्ता दाखवू लागल्या.खरचं गम्मत वाटते कि हायवे अगर शहरातील रस्ता नाही तर अगदी छोट्या छोट्या गावातील रस्ता सुद्धा अचूक दाखवला जात होता.आम्ही गाणी ऐकत खात पीत विंडसरला पोचलो साधारण १० वाजता. पार्किंग ची समस्या सर्व ठिकाणी सारखीच आहे. पे पार्किंग शोधून त्यात गाडी लावून अनिकेत आला.तोवर आम्ही तिकिटाच्या रांगेत शिरलो. १० वाजताच हा राजवाडा उघडतो पण प्रवासी आधीच येवून पोचलेले होते. रांग खूप मोठी होती.पण सर्व शांत शिस्तीत उभे होते.सर्वच कामे इकडे संगणकावर .तिकिटे काढली त्य नंतर सिक्यूरिटी चेकिंग झाले. आमचे आणि आमच्या पर्स, सामानाचे. नंतर प्रवेश. एका युरोपियन सुरेख बाईने आमचे स्वागत केले.

एका भल्या मोठ्या दरवाजातून आम्ही प्रवेश केला.समोर विशाल किल्ला दिसत होता.हा राजवाडा किल्ल्यात आहे.या ठिकाणी वर्षातील काही दिवस म्हणजे समर मध्ये राणी अजूनही इकडे येवून राहते.त्यामुळे त्याचे महत्व अधिक होते.त्या दिवशी पण तिकडे काहीतरी कार्यक्रम होताच.आम्ही तयारी बाहेरून पाहिली.काही दालने म्हणून बंद होती.पण जी दालने प्रवाशांना बघयला उपलब्ध होती ती बघायला सुरवात केली.

प्रथम त्याचा नकाशा घेतला [पथदर्शक मार्ग]. तो भव्य राजवाडा बाहेरून बघत फिरायला सुरवात केली. इतक्या उंचावरून सर्व परिसर न्याहाळत प्रथम आम्ही क्वीन मेरीचे डॉल हॉउस बघायला गेलो. खेळातली बाहुली आणि भातुकली!
पण ती आपल्या सारख्या सामान्य माणसाची नाही......तर खुद्ध क्वीन मेरीचे! 
विचार करा........

चक्क राजवाड्याची प्रतिकृतीच म्हणा, असे ते बाहुली घर. प्रत्येक दालनात छोट्या छोट्या पण सुबक वस्तू मांडल्या होत्या. प्रशस्त हॉल पासून राणीची बेड रूम, डायनिंग रूम, देवघर, दरबार, कपाटे, बाथरूम, एक ना अनेक सर्व हुबेहूब वस्तू होत्या. त्या नंतर अगदी ३/४ वर्षाच्या मुलीच्या इतकी बाहुली आणि तिचे सर्व प्रकारचे कपडे, दागिने, अगदी चप्पल बूट पासून सर्व काही जतन करून ठेवलेले होते.

त्या ठिकाणाहून बाहेर पडलो.दुसर्या दालनात गेलो,त्या ठिकाणी १६०० सालापासूनचे काचेचे डिनर सेट, टी सेट मांडून ठेवले होते. इतके अप्रतिम कि बघतच राहावे. आश्चर्य म्हणजे अजूनही ते जसे च्या तसे आहेत. आत्ताही ते काही विशेष कार्यक्रमाला ते वापरले जातात.[हातून पडत फुटत कसे नाहीत,याची शंका मनात आली] उच्च प्रतीचे काचेचे सेट पाहून धन्य झाले.

Monday, June 6, 2011

लंडन मध्ये फेर-फटका आणि कोहिनूर हिरा

गुरुवारी सकाळीच लवकर आवरून मी आणि नंदिनी लंडन शहर पाहायला निघालो.आज ट्रेन चा अनुभव घ्यायचा होता.इकडे ट्यूब रेल वे प्रसिद्ध आहे.आम्हाला लंडन ब्रिज स्टेशन ला जायचे होते.त्या साठी आम्ही फास्ट ट्रेन ने निघालो.त्या स्टेशन पासून जवळ जवळ ४० मिनिटे चालत टॉवर ऑफ  लंडन या प्रसिध्द ठिकाणी पोचलो.

खूप प्रवासी आले होते. इकडचे रहिवासी पण आले होते.  इथे एक चांगली गोष्ट आहे कि प्रत्येक ठिकाणी नकाशा आणि माहिती पुस्तक मोफत ठेवलेले असते.त्या मुळे आपणच आपले गाईड. टॉवर बघायला सुरवात केली. एक युरोपियन गाईड तिकडचा इतिहास सांगत होता,मला कळणे कठीणच.पुढे काही अंतरावर एक जादुगार अगदी साधे खेळ करून दाखवत होता.आम्ही नकाशा बघून प्रथम कोहिनूर बघणे पसंद केले.याचे टॉवर मधील ठिकाण शोधले.टॉवर म्हणजे आपल्याकडचा शनिवार वाडा,पण सुस्थितीत, आणि ४ ते ५ पट मोठा.

कोहिनूर पहायला टूरिस्टची गर्दी
कोहिनूर बघण्यासाठी सर्वात मोठी रांग होती.आम्ही पण रांगेत उभे राहिलो.तशी रांग भर भर पुढे सरकत होती.आत गेल्यावर अगदी पूर्वी पासूनची त्या काळची पदके लावलेली होती.त्या नंतर आत मात्र अगदी सिद्धी विनायकासारखी गोल गोल फिरत जाणारी मोठी रांग.पण पडद्या वर सर्व दागिने आणि इतिहास दाखवला जात होता.त्या मुळे रांगेत उभे राहून फार कंटाळा आला नाही.अखेर आम्ही त्या कडक सुरक्षा असलेल्या खोलीत शिरलो. तिकडे काचेच्या बंद पेट्यातून सर्व दागिने,कोहिनूर हिरा,आणि त्या अल्ची सोन्याची कलाकुसर अप्रतिम केलेली अप्रतिम भांडी छान मांडून ठेवली होती.सर्व बघून अगदी डोळे दिपून गेले.माझे एकदा पाहून समाधान झाले नाही परत एकदा जाऊन तो कोहिनूर हिरा पाहून आले.प्रगत देशात सर्व प्रगत.तो हिरा पाहायला पण सरकता रस्ता.कोणी जास्त वेळ थांबूच शकत नाही,पण आश्चर्य म्हणजे तिकडे आत एकही पहारेकरी नही,कोणी कुणाला ढकलत नाही.शिस्तीने सर्व बघत पुढे पुढे जात होते.त्या काळातील राज घराण्यातील ती सर्व सोन्याची [शुद्ध]भांडी,दागिने बघून धन्य झाले. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय ते मला तेव्हा  कळले.

कोहिनूर जेव्हा बाजूबंध होता तेव्हा असा दिसायचा













आपल्यावर या इंग्रजांनी राज्य केले,आणि आपले सर्व लुटून नेले.आणि आता ते वैभवात आहेत आणि आपला देश मात्र कर्जबाजारी झाला आहे.या विचाराने माझे मन फार खिन्न झाले.खर सांगू मला पुढे त्या टॉवर मध्ये फिरावे पण वाटले नाही.तिकडे तो कोहिनूर सुरक्षित आहे हे मात्र नक्की.

स्पिनेकर टॉवर


गेट  वर सर्व जण जमलो. दुपारी ३.३० वाजताच्या फेरी चे आरक्षण केलेले होते. पण आम्ही जरा लवकरच पोचलो त्या मुळे ३च्या फेरीत जागा मिळाली.परत तोच सुखद अनुभव. आमच्या एका मागून एक ४ गाड्या बोटीवर चढल्या.परत येताना भरपूर गाड्या आणि प्रवासी घेऊन बोट निघाली.या वेळी पण डेक वर गेलो फोटो काढले.विशाल सागराचे डोळे भरून दर्शन घेतले.आता उतरल्यावर पुढचा बेत तयार होताच...

आम्ही सर्व स्पिनेकर टॉवर बघायला गेलो. अगदी फेरी बोटीपासून दहा ते पंधरा मिनिटे अंतरावर होता. त्या ठिकाणी खाली प्रचंड मोठा मॉल आहे.सर्व नामांकित कंपन्याची दुकाने आहेत.तिकडे खरेदीला येणारी लोकांची खूप गर्दी होती.पण मला आवडले ते रोड वर सिग्नल च्या बाजूलाच प्रत्येक ठिकाणी किती व कोठे पार्किंग शिल्लक आहे ते कळत होते.पार्किंग चार्ज तासावर होता.पण सोय छान होती.ते बघून त्या प्रमाणे लोक गाड्या प्रक करत होते. 

आम्ही आता तिकीट काढून स्पिनेकर टॉवर बघायला गेलो.अबब !!!
बाप रे !!!!!!!!!!!!!!!!!किती उंच टॉवर.लिफ्ट ने १०० व्या मजल्यावर. लिफ्ट ला वेग इतका होता कि आम्ही झुमकन वर गेलो.तिकडे गेल्यावर विचार करा ,१०० व्या मजल्यावरून लंडन शहराचे दृष्य किती विहंगम दिसत होते.चारही बाजूने फिरत लंडन लंडन शहराचे दर्शन घेतले.त्या ठिकाणी मधोमध पारदर्शक काच बसवली आहे,त्यातून खाली खोलवर म्हणजे १०० मजले खोल स्पष्ट दिसते.बघवत नव्हते इतके खोल.पण एक वेगळा अनुभव.अजून आणखी एक जिना चढून पण वर जाता येत होते.काही हौशी लोक [त्यात आम्ही पण]वर जाऊन पण खाली बघत होते.वरून सर्व अगदी चिमुकले चिमुकले दिसत होते पण गम्मत वाटत होती.उंच टॉवर बघण्याचा ह माझा पहिलाच अनुभव.लगेच मी अनिकेतला "आपण Paris ला आयफेल टॉवर बघयला जाऊ या" सांगून टाकले.

स्पिनेकर टॉवर बघून झुमकन खाली आलो. आता सर्व खरेदीच्या मूड मध्ये होते.मी थोडी दुकाने फिरले आणि नंतर एका बाकावर विसावले.आता मात्र आमची बच्चे कंपनी कंटाळली होती.त्यांनी सूर लावायला सुरवात केली त्या मुळे जरा वेळेवरच मॉल मधून सर्व लवकर बाहेर पडले.रात्रीच्या जेवणासाठी क्रोयडन मधील इंडियन हॉटेल मधून मागवायचे ,हे एकमताने ८ दिवस आधीच ठरले होते.त्याचे नाव "फुशिया".ते सर्वांचे आवडते हॉटेल आहे.गाडीतून येतानाच फोनवरून ऑर्डर दिली होती.त्या मुळे लवकर जेवण आले.आता सर्व मंजिरी कडे उतरलो होतो.जेवून खाऊन सर्वांनी निरोप घेतला.पुढील विक एंड ला भेटायचे ठरवून सर्व घरी परतलो.४ दिवस कुठे गेले समजले नाही.पण एकंदर खूप मजा केली.रात्री घरी आलो.


सकाळी उठून अनिकेत ला ४ दिवस टर्की ला जायचे होते. परत bag मध्ये सामान भरणे सुरु झाले. मंगळवारी म्हणजे दुसर्या दिवशी मी आणि नंदिनी ने मस्त आराम केला.