Monday, June 20, 2011

विंडसर आणि रोमन बाथ--राजवाडा, स्टोनहेंजची झलक आणि बाथ

त्या नंतर राजवाड्यातील एकेक खोली म्हणजे प्रशस्त दालने बघायला सुरवात केली. मला स्वतःला सर्व राजवाडा आवडला पण विशेष आवडली ती सर्व हत्यारे ठेवलेली दालने. त्या काळची सर्व शस्त्रस्त्रे इतकी सुबक मांडणी करून ठेवली आहेत.ते बघून थक्क झाले.प्रत्यक्षात किती हत्यारे त्या काळी त्यांच्या कडे होती,याची ती एक झलक होती.

राणीचा दरबार, शयन गृह, सल्ला मसलत करायची खोली त्या ठिकाणी प्रत्येक वस्तू वर केलेली कलाकुसर पाहून मन प्रसन्न झाले. राणीला कलेची किती कदर होती हे जाणवले. प्रत्येक वेळी खरच तिची निवड अप्रतिम आहे हे जाणवत होते. इतकी वर्ष झाली तरी त्या सरकारने त्या सर्व गोष्टी इतक्या छान जतन करून ठेवल्या आहेत याचे खूप कौतुक वाटले. प्रशस्त डायनिंग रूम आणि टेबल पाहून त्या काळी एकत्र कुटुंब पद्धती किती सुखद होती, हे जाणवले. तिकडे जे सिक्युरिटी गार्ड [सुरक्षा रक्षक] आहेत त्यांची ड्युटी बदलतानाची [चेंज ऑफ गार्ड] परेड पाहिली.

किती तरी वर्ष झाली, सुरक्षेची नवीन साधने आली.पण त्यांची ती शिस्त, कवायत, त्यांचे ते त्या काळचे पोशाख, सतत दक्ष राहणारे ते गार्ड बघून थक्क झाले. हे सर्व आहे तसे सुरक्षित त्यांच्या मुळेच टिकून आहे याची खात्री पटली.संपूर्ण राजवाड्याभोवती संरक्षक भिंत आहे,मोठमोठे बुरुज आहेत.आणि ते सर्व सुस्थितीत आहे हे विशेष..हे सर्व टिकवायला त्यांनी प्रवेश फी हजार रुपयाच्या वर प्रत्येकी घेतली त्याचे काही वाटले नाही.आपल्या कडे फंड [पैसा] कमी पडतो हे नक्की.....

परतताना आम्ही जॉर्ज चापेल बघायला शिरलो. ते म्हणजे त्यांचे प्रार्थना स्थळ [मंदिर]. त्या ठिकाणी काही विशिष्ट लोकांच्या कबर आहेत.विशेष म्हणजे नुसते कबरीवर [थडग्यावर] नाव नाही तर त्यांचा संगमरवरी आडवा पुतळा आहे.त्या ठिकाणी कमालीची शांतता होती. खरच मला सुद्धा ५ मिनिटे शांत मन एकाग्र करून तिकडे बसावेसे वाटले.आसन व्यवस्था पण उत्तम.

युरोपियन लोकांच्या प्रेक्षणीय ठिकाणाची खासियत म्हणजे आपण ज्या दालनातून बाहेर पडतो तो मार्ग चक्क दुकानात जातो.तुम्ही त्या ठिकाणी जाऊन वस्तू बघून खरेदी करूनच बाहेर पडता. दुसरी खासियत म्हणजे खायला हॉटेल शिवाय बाहेर काही मिळणार नाही. आणि कमालीचे क्लीन. राजवाडा मी प्रथमच पाहीला होता त्याने मी खूप खुश होते. बाहेर पडल्यावर फोटो काढले. जरा फ्रेश झालो. आणि मग गाडीत बसलो.

आता मात्र भूक चांगलीच लागली होती.अनिकेत ने मॅक डोनाल्डचे पार्सल घेतले होते आणि घरातील खाऊ [लाडू,पराठे] पण पॅक केला होता. गाडी गावातून बाहेर पडल्यावर लगेच गाडीत खायला सुरवात केली. इकडे वाहतूक अगदी शिस्तीत असल्याने अनिकेतला गाडी चालवताना डाव्या हाताने खाता येत होते. युरोपियन पद्धती प्रमाणे आम्ही पण खाताना कोक घेणे पसंद केले. रस्त्यात दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, निसर्ग सौंदर्य छान दिसत होते. इकडे कुठेच उजाड माळरान नाही, कि झोपड्या, नाले, घाण नाही. खात पीत गप्पा मारत आम्ही एक तासाने स्टोनहेंजला पोचलो.पोस्ट कोड टाकल्याने आमचा बोलका बाहुला रस्ता अचूक दाखवत होता.

अनिकेतच्या मित्रांनी आधीच सांगून ठेवले होते त्या मुळे आम्ही ते एकावर एक ठेवलेले दगड बाहेरून बघणे पसंद केले, नंदिनी ने जाऊन बाहेरून फोटो अगदी सर्व दिशेने काढले. मी अनिकेत ने गाडीतूनच बघितले. मला अजून त्या दगडचा इतिहास समजला नाही पण गूगल वर शोधून नक्की सांगेन. तसे आम्ही तेथून लगेच निघालो.

पुढे बाथ ला जायचे होते. बाथ म्हणजे रोमन काळातील गरम व गार पाण्याची कुंडे. बाथला जायला २ तास लागणार होते. वाटेत मुसळधार पाऊस पडत होता. मी मागे बसून अनिकेतला सतत सूचना देत होते. सर्वच वाहने कमी वेगात जात होती. तिकडे एक चांगले असते कोणी कुणाला ओवर टेक करत नाहीत. जाताना मधेच आमच्या गाडीतून आवाज येवू लागला.आम्ही तिघे थोडेसे काळजी करू लागलो.वाटेत कुठेही एकही दुरुस्ती चे दुकान नाही.पण आम्ही सुखरूप बाथला पोचलो.

No comments:

Post a Comment