Monday, June 20, 2011

विंडसर आणि रोमन बाथ--रोमन बाथ ते इंडियन चायनिझ

प्रथम अनिकेतने त्या गाडीच्या एजन्सिला फोन केला आणि थोड्याच वेळात तिकडचा एक मेकॅनिक हजर झाला. गाडी बघून दुरुस्ती थोडीशी करून गेला. आवाज येणे बंद झाले. त्या मुळे परतीच्या प्रवासात टेन्शन नव्हते.

रोमन बाथ मध्ये जुन्या पुरातन वस्तू खूप आहेत. अजूनही इतक्या थंड हवेत त्या ठिकाणी कुंडाचे पाणी कोमट आहे.पण त्या ठिकाणी जे गार पाण्याचे कुंड आहे ते मात्र नीट नव्हते. म्हणजे पाणी सर्व हिरवेगार झाले होते. नाव ठेवायला तेवढेच.....पण त्या बाथ च्या ३ माजली इमारतीमध्ये जागोजागी पडद्यावर त्या काळचा इतिहास दाखवला जात होता. कथा चित्रित केल्या होत्या.

एक जागा अशी होती कि तिथे मोठे पाण्याचे कुंड होते, त्यात लोकांनी खूप नाणी टाकली होती. आपल्याकडे गंगेत टाकतात तशी. पण या वरून ते पण श्रद्धाळू आहेत हे जाणवले. आपल्या मनातील इच्छा बोलून नाणे पाण्यात टाकतात.हे प्रत्यक्ष पाहिले. आपल्याकडचा नवस किंवा कौल ....पण कोणीही इतकी नाणी समोर पडलेली दिसत असताना पाण्यात उतरत नव्हते. हे विशेष दिसले. खरच इकडे गरिबी बेकारीनाहीच का? प्रश्न पडला.

बाथ संपूर्ण फिरून आम्ही बाहेर पडलो, आता मत्र थकायला झाले होते. मस्त एक कॅटबरी घेतली. गाडीत बसलो. कॅटबरी खाल्ल्यावर जरा एनर्जी वाटली. त्या नंतर परतीचा प्रवास सुरु. आता गाडी ओके होती. घरी परत जाताना अजून एक ठिकाण बघायचे होते ते म्हणजे हाउन्सलो. हाउन्सलो म्हणजे लंडन मधील एक भाग. अनिकेतचे जुने घर आणि त्या ठिकाणी असलेली सर्व इंडियन वस्ती. दुकाने हॉटेल. रात्री जेवायचं इंडियन हॉटेल मध्ये हे नक्की होते.

आम्ही हाउन्सलो मध्ये पोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. बरीच दुकाने बंद झाली होती. पार्किंग मध्ये गाडी लावली.समोर अॅस्डा होते. अॅस्डा म्हणजे आपल्या कडील बिग बझार.पण मोठ्या प्रमाणात.त्या ठिकाणी गेलो.

दुध, भाज्या, फळे व इतर सामान घेतले,गाडीत टाकले.त्या नंतर चालत चालत फिरायला सुरवात. त्या भागाची माहिती दोघे मला देत होते त्यांच्या पद्धतीने. म्हणजे अनिकेतच्या भाषेत हा रोड म्हणजे आई इकडचा लक्ष्मी रोड.

नंतर एका खास मराठी मुलाचे हॉटेल, श्री कृष्ण वडा पाव सेंटर, या ठिकाणी मोर्चा वळवला.पण त्या जागी ते दुकान नव्हतेच. शोध सुरु. फिरत फिरता सापडले. धन्य झालो! त्या दुकानात जाऊन अगदी आपल्या पद्धतीचा चहा आणि वडा पाव घेतला. मस्त कडक चहा पिऊन तरतरी आली आणि चक्क तो मुलगा मराठीत बोलत होता! खरच त्या मुळे इतके बरे वाटले. बाहेर गेलो कि आपल्या भाषेची किंमत कळते.त्याच्या कडे आपल्या सणानुसार पदार्थ मिळतात,लगेच नंदिनी ने माहिती दिली.सांगितले आई,संक्रांतीला आम्ही गुळाची पोळी याच्या कडेच खाल्ली.खरच लंडन सारख्या ठिकाणी एका मराठी मुलाने असे दुकान[हॉटेल]चालवायचे,कौतुक वाटले.

त्या नंतर परत चालत चालत आम्ही फ्लेवर्स ऑफ इंडिया, या इंडियन हॉटेल मध्ये गेलो. जरा विसावलो. ते हॉटेल म्हणजे आपल्या कडील अर्बन तडका...तसेच आतील डेकोरेशन होते. इकडे मात्र खास पंजाबी चायनीज चमचमीत मिळत होते. इकडे युरोपात हॉटेल मध्ये गेलो तर काहीच मसालेदार मिळत नाही.गोरे लोक अगदी फिके जेवण जेवतात.वडा पाव खाल्याने भूक थोडीच होती.पण बिअरच्या बरोबर चिकन लोलीपोप विथ शेझवॉन सॉस [आपल्याकडची लाल जर्द शेझवॉन चटणी] आणि व्हेज क्रिस्पी वर आम्ही ताव मारला. खूप टेस्टी होते सर्व! नंतर न जेवता कुल्फी, गुलाबजाम घेतला. मस्त पोटभर जेवून बाहेर पडलो.

बाहेर गारठा चांगलाच वाढला होता. मी तर कुडकुडत गाडीत जाऊन बसले. आता मात्र गाडीत मागील सीटवर पाय वर घेऊन बसले,कारण पाय आता बोलू लागले होते.एक तासाने आम्ही घरी पोचलो.मी लगेच आवरून झोपणे पसंद केले.तिने लगेच फोटो अपलोड केले. सकाळी उठ्ल्यावर लगेच मी फोटो पाहिले, आणि मैत्रिणिंना पाठवले.

आज रविवार सुट्टी. आराम करायचे कालच नक्की झाले.माझा आज चतुर्थीचा उपास .थोडे फराळाचे केले,आणि दिवसभर आराम व ऑनलाईन गप्पा मारल्या. सुशील चा आज वाढदिवस असल्याने त्याला फोन केला.आरामात दिवस घालवला......

No comments:

Post a Comment