Monday, June 20, 2011

विंडसर आणि रोमन बाथ--रोमन बाथ ते इंडियन चायनिझ

प्रथम अनिकेतने त्या गाडीच्या एजन्सिला फोन केला आणि थोड्याच वेळात तिकडचा एक मेकॅनिक हजर झाला. गाडी बघून दुरुस्ती थोडीशी करून गेला. आवाज येणे बंद झाले. त्या मुळे परतीच्या प्रवासात टेन्शन नव्हते.

रोमन बाथ मध्ये जुन्या पुरातन वस्तू खूप आहेत. अजूनही इतक्या थंड हवेत त्या ठिकाणी कुंडाचे पाणी कोमट आहे.पण त्या ठिकाणी जे गार पाण्याचे कुंड आहे ते मात्र नीट नव्हते. म्हणजे पाणी सर्व हिरवेगार झाले होते. नाव ठेवायला तेवढेच.....पण त्या बाथ च्या ३ माजली इमारतीमध्ये जागोजागी पडद्यावर त्या काळचा इतिहास दाखवला जात होता. कथा चित्रित केल्या होत्या.

एक जागा अशी होती कि तिथे मोठे पाण्याचे कुंड होते, त्यात लोकांनी खूप नाणी टाकली होती. आपल्याकडे गंगेत टाकतात तशी. पण या वरून ते पण श्रद्धाळू आहेत हे जाणवले. आपल्या मनातील इच्छा बोलून नाणे पाण्यात टाकतात.हे प्रत्यक्ष पाहिले. आपल्याकडचा नवस किंवा कौल ....पण कोणीही इतकी नाणी समोर पडलेली दिसत असताना पाण्यात उतरत नव्हते. हे विशेष दिसले. खरच इकडे गरिबी बेकारीनाहीच का? प्रश्न पडला.

बाथ संपूर्ण फिरून आम्ही बाहेर पडलो, आता मत्र थकायला झाले होते. मस्त एक कॅटबरी घेतली. गाडीत बसलो. कॅटबरी खाल्ल्यावर जरा एनर्जी वाटली. त्या नंतर परतीचा प्रवास सुरु. आता गाडी ओके होती. घरी परत जाताना अजून एक ठिकाण बघायचे होते ते म्हणजे हाउन्सलो. हाउन्सलो म्हणजे लंडन मधील एक भाग. अनिकेतचे जुने घर आणि त्या ठिकाणी असलेली सर्व इंडियन वस्ती. दुकाने हॉटेल. रात्री जेवायचं इंडियन हॉटेल मध्ये हे नक्की होते.

आम्ही हाउन्सलो मध्ये पोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. बरीच दुकाने बंद झाली होती. पार्किंग मध्ये गाडी लावली.समोर अॅस्डा होते. अॅस्डा म्हणजे आपल्या कडील बिग बझार.पण मोठ्या प्रमाणात.त्या ठिकाणी गेलो.

दुध, भाज्या, फळे व इतर सामान घेतले,गाडीत टाकले.त्या नंतर चालत चालत फिरायला सुरवात. त्या भागाची माहिती दोघे मला देत होते त्यांच्या पद्धतीने. म्हणजे अनिकेतच्या भाषेत हा रोड म्हणजे आई इकडचा लक्ष्मी रोड.

नंतर एका खास मराठी मुलाचे हॉटेल, श्री कृष्ण वडा पाव सेंटर, या ठिकाणी मोर्चा वळवला.पण त्या जागी ते दुकान नव्हतेच. शोध सुरु. फिरत फिरता सापडले. धन्य झालो! त्या दुकानात जाऊन अगदी आपल्या पद्धतीचा चहा आणि वडा पाव घेतला. मस्त कडक चहा पिऊन तरतरी आली आणि चक्क तो मुलगा मराठीत बोलत होता! खरच त्या मुळे इतके बरे वाटले. बाहेर गेलो कि आपल्या भाषेची किंमत कळते.त्याच्या कडे आपल्या सणानुसार पदार्थ मिळतात,लगेच नंदिनी ने माहिती दिली.सांगितले आई,संक्रांतीला आम्ही गुळाची पोळी याच्या कडेच खाल्ली.खरच लंडन सारख्या ठिकाणी एका मराठी मुलाने असे दुकान[हॉटेल]चालवायचे,कौतुक वाटले.

त्या नंतर परत चालत चालत आम्ही फ्लेवर्स ऑफ इंडिया, या इंडियन हॉटेल मध्ये गेलो. जरा विसावलो. ते हॉटेल म्हणजे आपल्या कडील अर्बन तडका...तसेच आतील डेकोरेशन होते. इकडे मात्र खास पंजाबी चायनीज चमचमीत मिळत होते. इकडे युरोपात हॉटेल मध्ये गेलो तर काहीच मसालेदार मिळत नाही.गोरे लोक अगदी फिके जेवण जेवतात.वडा पाव खाल्याने भूक थोडीच होती.पण बिअरच्या बरोबर चिकन लोलीपोप विथ शेझवॉन सॉस [आपल्याकडची लाल जर्द शेझवॉन चटणी] आणि व्हेज क्रिस्पी वर आम्ही ताव मारला. खूप टेस्टी होते सर्व! नंतर न जेवता कुल्फी, गुलाबजाम घेतला. मस्त पोटभर जेवून बाहेर पडलो.

बाहेर गारठा चांगलाच वाढला होता. मी तर कुडकुडत गाडीत जाऊन बसले. आता मात्र गाडीत मागील सीटवर पाय वर घेऊन बसले,कारण पाय आता बोलू लागले होते.एक तासाने आम्ही घरी पोचलो.मी लगेच आवरून झोपणे पसंद केले.तिने लगेच फोटो अपलोड केले. सकाळी उठ्ल्यावर लगेच मी फोटो पाहिले, आणि मैत्रिणिंना पाठवले.

आज रविवार सुट्टी. आराम करायचे कालच नक्की झाले.माझा आज चतुर्थीचा उपास .थोडे फराळाचे केले,आणि दिवसभर आराम व ऑनलाईन गप्पा मारल्या. सुशील चा आज वाढदिवस असल्याने त्याला फोन केला.आरामात दिवस घालवला......

विंडसर आणि रोमन बाथ--राजवाडा, स्टोनहेंजची झलक आणि बाथ

त्या नंतर राजवाड्यातील एकेक खोली म्हणजे प्रशस्त दालने बघायला सुरवात केली. मला स्वतःला सर्व राजवाडा आवडला पण विशेष आवडली ती सर्व हत्यारे ठेवलेली दालने. त्या काळची सर्व शस्त्रस्त्रे इतकी सुबक मांडणी करून ठेवली आहेत.ते बघून थक्क झाले.प्रत्यक्षात किती हत्यारे त्या काळी त्यांच्या कडे होती,याची ती एक झलक होती.

राणीचा दरबार, शयन गृह, सल्ला मसलत करायची खोली त्या ठिकाणी प्रत्येक वस्तू वर केलेली कलाकुसर पाहून मन प्रसन्न झाले. राणीला कलेची किती कदर होती हे जाणवले. प्रत्येक वेळी खरच तिची निवड अप्रतिम आहे हे जाणवत होते. इतकी वर्ष झाली तरी त्या सरकारने त्या सर्व गोष्टी इतक्या छान जतन करून ठेवल्या आहेत याचे खूप कौतुक वाटले. प्रशस्त डायनिंग रूम आणि टेबल पाहून त्या काळी एकत्र कुटुंब पद्धती किती सुखद होती, हे जाणवले. तिकडे जे सिक्युरिटी गार्ड [सुरक्षा रक्षक] आहेत त्यांची ड्युटी बदलतानाची [चेंज ऑफ गार्ड] परेड पाहिली.

किती तरी वर्ष झाली, सुरक्षेची नवीन साधने आली.पण त्यांची ती शिस्त, कवायत, त्यांचे ते त्या काळचे पोशाख, सतत दक्ष राहणारे ते गार्ड बघून थक्क झाले. हे सर्व आहे तसे सुरक्षित त्यांच्या मुळेच टिकून आहे याची खात्री पटली.संपूर्ण राजवाड्याभोवती संरक्षक भिंत आहे,मोठमोठे बुरुज आहेत.आणि ते सर्व सुस्थितीत आहे हे विशेष..हे सर्व टिकवायला त्यांनी प्रवेश फी हजार रुपयाच्या वर प्रत्येकी घेतली त्याचे काही वाटले नाही.आपल्या कडे फंड [पैसा] कमी पडतो हे नक्की.....

परतताना आम्ही जॉर्ज चापेल बघायला शिरलो. ते म्हणजे त्यांचे प्रार्थना स्थळ [मंदिर]. त्या ठिकाणी काही विशिष्ट लोकांच्या कबर आहेत.विशेष म्हणजे नुसते कबरीवर [थडग्यावर] नाव नाही तर त्यांचा संगमरवरी आडवा पुतळा आहे.त्या ठिकाणी कमालीची शांतता होती. खरच मला सुद्धा ५ मिनिटे शांत मन एकाग्र करून तिकडे बसावेसे वाटले.आसन व्यवस्था पण उत्तम.

युरोपियन लोकांच्या प्रेक्षणीय ठिकाणाची खासियत म्हणजे आपण ज्या दालनातून बाहेर पडतो तो मार्ग चक्क दुकानात जातो.तुम्ही त्या ठिकाणी जाऊन वस्तू बघून खरेदी करूनच बाहेर पडता. दुसरी खासियत म्हणजे खायला हॉटेल शिवाय बाहेर काही मिळणार नाही. आणि कमालीचे क्लीन. राजवाडा मी प्रथमच पाहीला होता त्याने मी खूप खुश होते. बाहेर पडल्यावर फोटो काढले. जरा फ्रेश झालो. आणि मग गाडीत बसलो.

आता मात्र भूक चांगलीच लागली होती.अनिकेत ने मॅक डोनाल्डचे पार्सल घेतले होते आणि घरातील खाऊ [लाडू,पराठे] पण पॅक केला होता. गाडी गावातून बाहेर पडल्यावर लगेच गाडीत खायला सुरवात केली. इकडे वाहतूक अगदी शिस्तीत असल्याने अनिकेतला गाडी चालवताना डाव्या हाताने खाता येत होते. युरोपियन पद्धती प्रमाणे आम्ही पण खाताना कोक घेणे पसंद केले. रस्त्यात दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, निसर्ग सौंदर्य छान दिसत होते. इकडे कुठेच उजाड माळरान नाही, कि झोपड्या, नाले, घाण नाही. खात पीत गप्पा मारत आम्ही एक तासाने स्टोनहेंजला पोचलो.पोस्ट कोड टाकल्याने आमचा बोलका बाहुला रस्ता अचूक दाखवत होता.

अनिकेतच्या मित्रांनी आधीच सांगून ठेवले होते त्या मुळे आम्ही ते एकावर एक ठेवलेले दगड बाहेरून बघणे पसंद केले, नंदिनी ने जाऊन बाहेरून फोटो अगदी सर्व दिशेने काढले. मी अनिकेत ने गाडीतूनच बघितले. मला अजून त्या दगडचा इतिहास समजला नाही पण गूगल वर शोधून नक्की सांगेन. तसे आम्ही तेथून लगेच निघालो.

पुढे बाथ ला जायचे होते. बाथ म्हणजे रोमन काळातील गरम व गार पाण्याची कुंडे. बाथला जायला २ तास लागणार होते. वाटेत मुसळधार पाऊस पडत होता. मी मागे बसून अनिकेतला सतत सूचना देत होते. सर्वच वाहने कमी वेगात जात होती. तिकडे एक चांगले असते कोणी कुणाला ओवर टेक करत नाहीत. जाताना मधेच आमच्या गाडीतून आवाज येवू लागला.आम्ही तिघे थोडेसे काळजी करू लागलो.वाटेत कुठेही एकही दुरुस्ती चे दुकान नाही.पण आम्ही सुखरूप बाथला पोचलो.

विंडसर आणि रोमन बाथ--क्वीन मेरीचे डॉल हाउस

शनिवार सकाळ लवकरच उजाडली.आम्हाला आज फिरायला बाहेर जायचे होते.सकाळी लवकर म्हणजे ८.३० वाजता बाहेर पडायचे असा बेत ठरला होता.मी सकाळी लवकर उठून माझे आवरून घेतले.चहा करून अनिकेतला उठवले. मग त्यांची आवराआवर सुरु झाली.माझी कामे मी उरकून घेतली.आज हवा खूपच खराब होती,मधेच मळभ येत होते,वारा खूप होता,पाऊस पडत होता.पण अरी आम्ही तसे बरेच वेळेवर निघालो.

गाडीत खायला प्यायला भरपूर घेतले होते.प्रथम निघालो विंडसर कासलला जायला. गाडीत बसल्या बसल्या Tomtom सुरु केलं. त्यात पोस्ट कोड टाकल्यावर त्या मेडम [Tomtom ] रस्ता दाखवू लागल्या.खरचं गम्मत वाटते कि हायवे अगर शहरातील रस्ता नाही तर अगदी छोट्या छोट्या गावातील रस्ता सुद्धा अचूक दाखवला जात होता.आम्ही गाणी ऐकत खात पीत विंडसरला पोचलो साधारण १० वाजता. पार्किंग ची समस्या सर्व ठिकाणी सारखीच आहे. पे पार्किंग शोधून त्यात गाडी लावून अनिकेत आला.तोवर आम्ही तिकिटाच्या रांगेत शिरलो. १० वाजताच हा राजवाडा उघडतो पण प्रवासी आधीच येवून पोचलेले होते. रांग खूप मोठी होती.पण सर्व शांत शिस्तीत उभे होते.सर्वच कामे इकडे संगणकावर .तिकिटे काढली त्य नंतर सिक्यूरिटी चेकिंग झाले. आमचे आणि आमच्या पर्स, सामानाचे. नंतर प्रवेश. एका युरोपियन सुरेख बाईने आमचे स्वागत केले.

एका भल्या मोठ्या दरवाजातून आम्ही प्रवेश केला.समोर विशाल किल्ला दिसत होता.हा राजवाडा किल्ल्यात आहे.या ठिकाणी वर्षातील काही दिवस म्हणजे समर मध्ये राणी अजूनही इकडे येवून राहते.त्यामुळे त्याचे महत्व अधिक होते.त्या दिवशी पण तिकडे काहीतरी कार्यक्रम होताच.आम्ही तयारी बाहेरून पाहिली.काही दालने म्हणून बंद होती.पण जी दालने प्रवाशांना बघयला उपलब्ध होती ती बघायला सुरवात केली.

प्रथम त्याचा नकाशा घेतला [पथदर्शक मार्ग]. तो भव्य राजवाडा बाहेरून बघत फिरायला सुरवात केली. इतक्या उंचावरून सर्व परिसर न्याहाळत प्रथम आम्ही क्वीन मेरीचे डॉल हॉउस बघायला गेलो. खेळातली बाहुली आणि भातुकली!
पण ती आपल्या सारख्या सामान्य माणसाची नाही......तर खुद्ध क्वीन मेरीचे! 
विचार करा........

चक्क राजवाड्याची प्रतिकृतीच म्हणा, असे ते बाहुली घर. प्रत्येक दालनात छोट्या छोट्या पण सुबक वस्तू मांडल्या होत्या. प्रशस्त हॉल पासून राणीची बेड रूम, डायनिंग रूम, देवघर, दरबार, कपाटे, बाथरूम, एक ना अनेक सर्व हुबेहूब वस्तू होत्या. त्या नंतर अगदी ३/४ वर्षाच्या मुलीच्या इतकी बाहुली आणि तिचे सर्व प्रकारचे कपडे, दागिने, अगदी चप्पल बूट पासून सर्व काही जतन करून ठेवलेले होते.

त्या ठिकाणाहून बाहेर पडलो.दुसर्या दालनात गेलो,त्या ठिकाणी १६०० सालापासूनचे काचेचे डिनर सेट, टी सेट मांडून ठेवले होते. इतके अप्रतिम कि बघतच राहावे. आश्चर्य म्हणजे अजूनही ते जसे च्या तसे आहेत. आत्ताही ते काही विशेष कार्यक्रमाला ते वापरले जातात.[हातून पडत फुटत कसे नाहीत,याची शंका मनात आली] उच्च प्रतीचे काचेचे सेट पाहून धन्य झाले.