Tuesday, July 26, 2011

टूर निघाली स्कॉटलंडला-1

ज मंगळवार १२.७ २०११! 


आज आम्ही सहलीला जायचे ठरले होते. २ दिवस माझी तयारी सुरु होती. नेहमी प्रमाणे वाटेत खायला काहीतरी हवे म्हणून मका आणि पोहे यांचा चिवडा करून घेतला. गोड काहीतरी हवे म्हणून नंदिनीच्या आवडीची गुळ पापडीची वडी करून घेतली.कपडे आणि इतर सामान खूप बॅगेत भरले होते.आम्ही रात्री ७.३० च्या विमानाने [इझी जेट]जाणार होतो. या लोकल विमान सेवेत सामानाचे वेगळे पैसे भरावे लागतात. एका २० किलोच्या बॅगेत आमचे तिघांचे कपडे राहणे शक्य नव्हते. अखेर केबिन बेग  स्वतंत्र भरली. सर्व तयारी करून निघालो. अनिकेतने घरी टॅक्सी  मागवली होतीच. त्यामुळे सुखाने विमान तळावर पोचलो. तिकडे मंजिरी,अश्विनी,अमोल आणि अक्षरा आधीच आले होते. आम्ही सर्व सोपस्कार करून आरामात जरा वेळ गप्पा मारत बसलो. ठीक ७.३० वाजता विमानाने उड्डाण केले.एकच तासाचा प्रवास होता.पण सहलीत लगेच खायला हवेच हा अलिखित नियम.....प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार खायला प्यायला घेतले. सर्व पैसे भरून. [पैसे नाही पौंड भरून]या प्रवासात विमान कंपनी कडून काहीच फुकट मिळत नाही.

अक्षराचा हा पहिलाच विमान प्रवास होता. सर्वांचे लक्ष त्या मुळे तिच्याकडे जास्त होते.तिचे मात्र इतरांकडे जास्त होते.खूप लोक दिसत होते ती खुश होती. प्रवासाचा तिने खरच लहान वयात आनंद लुटला.विमानातून उतरल्यावर सामान घेतले,आणि बाहेर पडलो. तिकडे जवळच "एंटरप्राइस कार रेंटल", या कंपनीचे कार्यालय होते. अनिकेतने आधीच ऑन लाईन ७ जागा असलेली गाडी आरक्षित करून ठेवली होती. 


इकडे भाडे तत्वावर गाड्या मिळतात. त्या ठिकाणी गेल्यावर गाडी बघून आम्ही सर्व विचारात पडलो. करण आमचे सामान खूप होते. गाडीत राहणे शक्य नव्हते.सुमारे एक तास सामान आणि लोक कसे बसवायचे ते ठरत नव्हते. अखेर अनिकेत ने २ ट्रिप करून आम्हाला लॉज वर नेले. एडिनबराचं [आपलं एडिनबर्घ]  लॉज पण प्रशस्त होतं. खोल्या छान नीटनेटक्या होत्या. स्वच्छ तर खूपच. तिकडे पण एक भारतीय काम करत होता.

या ठिकणी पण रात्री १० नंतर काही मिळत नाही,म्हणून अश्विनीने लगेच पिझ्झा मागवून ठेवला. जरा असा तसाच होता. पण भूक लागली होती त्यामुळे सर्वांनी मुकाट्याने खाल्ला. आता सर्वांनाच नामांकित कंपनीचा पिझ्झा खायची सवय झाली आहे.रात्री खाऊन गप्पा मारून, उद्या कुठे, किती वाजता जायचे ते ठरवून प्रत्येक जण आपापल्या खोलीत झोपायला गेले.मी आणि मंजिरी खूप दिवसांनी असे बाहेर एकत्र राहायला होतो.खूप वेळ गप्पा मारून खूप उशिरा झोपलो.

No comments:

Post a Comment