Tuesday, July 26, 2011

टूर निघाली स्कॉटलंडला-4


आज १५/७!

सकाळीच नाश्ता करताना आज स्ट्रॉबेरी फार्मवर जायचे ठरले.जवळच रस्त्यात येताना लागलेल्या फार्म कडे मोर्चा वळवला.पण आता त्या ठिकाणी आता फार्म नाही हे समजले. त्यांच्याकडूनच दुसर्या ठिकाणी असलेल्या या फार्मचा पत्ता [आपल्या भाषेत, आपण पत्ता म्हणू], म्हणजेच इकडच्या भाषेत पोस्ट कोड घेतला. ७-८ मैल अंतरावर असलेल्या फार्मवर आम्ही पोचलो. गाडी अगदी आत पर्यंत नेता आली.आणि बघतो तर काय! स्ट्रॉबेरी,रासबेरी! आणि इकडचे समर फळ, जे द्राक्षासारखे दिसत होते...त्यांना समरबेरीज म्हणतात.त्यांनी सर्व झाडे लगडली होती.तिकडे गेल्यावर त्या फार्मच्या मालकाने आमच्या हातात २/३ पुठ्याच्या परड्या [बास्केट] स्ट्रॉबेरी गोळा करण्यासाठी दिल्या. 

मी प्रथमच स्ट्रॉबेरीचे झाड पाहत होते. अगदी एक फुट उंचीचे.पूर्ण मळ्यात रोपांना स्त्राव्बेरी भरपूर आल्या होत्या.लहान मोठ्या आकाराच्या, आणि अगदी लालबुंद! आपण आपल्या हाताने किती,कोणत्या हव्या त्या तोडून घ्यायच्या, खरच मजा वाटत होती. आम्ही सर्व जण त्या गोळा करण्यात दंग झालो होतो. आपल्याकडे खोक्यात पानात ठेवलेल्या डझन २ डझन विकत घेणे हेच माहित होते.त्यामुळे या झाडावरील कढून घेण्याचा आनंद वेगळाच होता.

त्या फार्म वर जरा वेळ फिरलो.फोटो काढले.आणि त्या स्ट्रॉबेरी वजन करून घेतल्या.आणि लगेचच अगदी लहान मुलांप्रमाणे आम्ही सर्वांनी त्यावर ताव मारला.ताज्या आणि लाल लाल मस्त होत्या.छोट्या अक्षराने पण अगदी मन लावून त्या खाल्या.आमची गोरीपान बाहुली लालेलाल झाली होती.प्रवासात २ दिवस पुरातील इतक्या बरोबर घेतल्या होत्या.त्या फार्म वरून बाहेर पडवत नव्हते.बरेच लोक तिकडे हा आनंद लुटत होते.विकेंड ला खर्या अर्थाने युरोपियन लोक घराबाहेर पडून मजा करत असतात,हे सतत बघायला मिळत होते. फार्म वरून निघताना मुंबईत कशा आहेत?काय भावाने स्ट्रॉबेरी मिळतात? याची चर्चा साहजिकच झाली. आता आम्ही मह्त्वाच्या ठिकाणी जाणार होतो. 

अनिकेत-अमोल अगदी उत्सुक होते त्या डिस्टीलरी  मध्ये जायला. ग्लेन ऑर्थ ही विस्की बनवणारी कंपनी आम्हाला जाताना वाटेत दिसली होती. त्यामुळे येताना सहज तिकडे पोचलो.लहान अक्षराला घेऊन अश्विनी बाहेर थांबली होती. आम्ही सर्वांनी आत प्रवेश केला.सगळीकडे अगदी मजबूत तिकीट असते बर का इकडे? पण मला काही त्याची कधी चिंता नव्हती. अनिकेत होता ते सर्व बघयला समर्थ! तो युरोपियन माणूस आम्हाला माहिती देवू लागला.अगदी प्रथम बारली दाखवली. ती भिजत घालून ठेवावी लागते. त्याला मोड आले कि सुकवून ठेवतात.मग बारीक करून योग्य प्रमाणात पाणी घालून किती दिवस कशी ठेवतात. ते सर्व दाखवले. आंबवणे ही क्रिया केली जाते. किती तरी फुट उंचीचे लाकडी मोठे मोठे कंटेनर होते. मला सतत आश्चर्य याचे वाटत होते कि कुठेही कामगार दिसला नाही. आणि परत सर्व अगदी चकचकीत. संपूर्ण कंपनीत ३-४ माणसे फक्त होती. हीच माणसे सर्व विभाग पाहतात. सर्व यंत्राच्या साह्यानेच होत होते. मोठ्या मोठ्या लाकडी पिंपातून [कास्क] वेगवेगळ्या चवीची विस्की भरून ठेवली होती.इकडे बाटल्या भरल्या जात नाहीत तर असेच कंटेनर इतर देशात पाठवले जातात. स्कॉटलॅंडची स्कॉच विस्की प्रसिद्ध आहे हे ऐकून होते.पण त्या सर्व प्रवासात आम्हाला इतक्या दिस्तालारी दिसल्या कि काय सांगू?सर्व देशात यांच्याकडूनच पुरवठा होत असेल.सर्व विभाग फिरून झाल्यावर सर्व लोकांना तो युरोपियन अगदी अगत्याने चव बघायला सर्व चवीच्या व्हिस्की देत होता.इतके प्रकार पाहून साड्या,कपडे यांच्या दुकानात बायकांचे जे होते ना तसे अगदी अनिकेत-अमोल चे झाले होते! अखेर किती तरी वेळाने ठरवून चव घेऊन बाटल्या खरेदी झाल्या. अगदी महत्वाचे काम झाल्यासारखे वाटले,कारण तीच गोष्ट त्यांच्या आवडीची होती. आता  जेवणात कुठेही वेळ घालवायचा नाही."आईल  ऑफ  स्काय" बरेच दूर आहे .वेळेवर जाऊ या ठरले.वाटेत काहीतरी घेऊन गाडीतच खाऊ या असे बोलणे झाले.परत सर्व गाडीत बसलो,निघालो.आता चर्चा फक्त व्हिस्कीचीच होती.

आजूबाजूला अफलातून निसर्ग सौंदर्य होते.रस्ता खरोखर प्रेक्षणीय होता. २ तास प्रवासात मस्त मजा करत जात होतो.अगदी निर्जन रस्ता होता.काही वेळात अचानक काय झाले आधी कळले नाही.पण गाडी पंक्चर झाली.इतका वेळ सर्व जण मस्त मूडमध्ये होतो.पण आता काय करायचे विचार सुरु झाला.कशीबशी गाडी एका बाजूला घेतली.आम्ही सर्व  खाली उतरलो.ही गाडी.भाड्याची होती.अनिकेत ने प्रथम कागद पत्र शोधून त्याला आधी फोन लावला.आम्ही एका बेटावर जात होतो त्या मुळे मोबाईलला नेटवर्क मिळत नव्हते. अखेर खूप प्रयत्नांनी फोन लागला.पण आम्ही नेमक्या कोणत्या ठिकाणी आहोत हे त्याला कसे सांगायचे प्रश्न पडला. 

जवळच काही अंतरावर २ घरे होती. अनिकेतने तिकडे जाऊन त्यांना विचारून त्या जागेचा पोस्ट कोड लिहून आणला.परत फोनाफोनी सुरु झाली. अखेर २ तासाने एक मेकॅनिक, एक भला मोठा ट्रक घेऊन आला.आपल्याकडे टायर काढून त्याचे पंक्चर काढून काम झाले असते,पण इकडे तसे नाही.त्याने आम्ही ७ माणसे आणि आमचे खूप सामान पाहिले.तो हैराण झाला! त्याने आमची सोय मात्र केली लगेच एक गाडी मागवली. त्याने आम्ही पुढे गेलो. त्या ट्रक वर गाडी चढवली आणि अनिकेत-नंदिनी ट्रक मध्ये बसून  त्याच्या बरोबर  गेले. 

जातानाचा रस्ता खूप सुरेख होता.पण कोणाचेच बाहेर लक्ष नव्हते.अनिकेत-नंदिनी गाडी घेऊन परत येईस्तोवर मी तर काळजीत वेळ घालवला. एकतर खूप वळणे असलेला रस्ता होता, त्यात मुसळधार पाऊस पडत होता. भरीला रस्त्यावर खूप हरणे येतात समजले होते. इकडे जंगली जनावरांना माणसांपेक्षा महत्व अधिक आहे.जिकडे तिकडे सुरक्षेसाठी बोर्ड लावलेले मी येताना वाचत आले होते.अखेर गाडीचे सर्व सोपस्कार करून ४ तासाने अनिकेत-नंदिनी आईल  ऑफ  स्कायला "डनोली हॉटेल" वर सुखरूप पोचले. 

येतानाच त्यांनी थांबून भारतीय जेवण आणले होते. दिवसभर सर्व तसे उपाशीच होते. आमच्या खोलीत बसून सर्व पोटभर जेवले. गप्पा तोच विषय सुरु होता.वारा पाऊस याचे बाहेर तांडव सुरु होते. आम्ही अगदी हौशीने उत्तर महा सागराच्या किनार्यावरील जागेत आरक्षण केले होते.एकतर रात्र खूप झाली होती त्या मुळे तो खवळलेला समुद्र खोलीतून बघणे पसंद केले.सर्व जण आज खुच थकलो होतो.लवकर झोपी गेलो.पण खरच सांगते सर्व अर्थाने दिवस लक्षात राहिला.

मला सतत नवल वाटत होते,कि आम्ही जेव्हा पंक्चरमूळे थांबलो होतो तेव्हा त्या रस्त्यावरून वार्याच्या वेगाने इतक्या गाड्या जात होत्या. पण कोणीसुद्धा थांबले नाही कि विचारले नाही. अगदी आमच्या जवळ लहान मुल होते, आम्ही ४ बायका होतो तरीसुद्धा....नाही म्हणायला जिथे गाडी उभी केली होती. तिकडे जवळच एक घर होते. त्या युरोपियन बाई ने आम्हाला निदान बाथरूम वापरायला दिले. नाहीतर थंड हवेत इतका वेळ बाहेर थांबणे, पंचाईत होती. निघताना त्यांनी अक्षरा साठी गरम पाणी ,बेबी फूड आहे का विचारले त्यातच आम्ही धन्य मानले.ही इकडची संस्कृती

No comments:

Post a Comment