Wednesday, July 27, 2011

टूर निघाली स्कॉटलंडला-5

१६/७ ला परत सकाळी खोली सोडायची होती. दिवसभर गाडीतून भटकायचे आणि रात्री झोपायला रोज नव्या ठिकाणी लॉज वर जायचे. असा आमचा ४ दिवस कार्यक्रम सुरु होता.इकडे बरेच जण असेच करतात. त्यामुळे लॉज सुद्धा फक्त बेड आणि ब्रेकफास्ट असे मिळतात. सकाळी उठून परत सर्व सामान गाडीत भरले. तिकडेच नाश्ता केला. जरा असा-तसा होता त्यामुळे कोणीच पोटभर खाल्ले नाही, आज प्रथम "एलीन डोनान" किल्ला बघायला जायचे होते.एक तासाच्या अंतरावर हा किल्ला होता. 

तो ४०० वर्षापूर्वीचा होता. भक्कम दगडी बांधकाम. खूप लोक पाहायला आले होते. आम्हाला तो किल्ला पाहण्याचे विशेष आकर्षण म्हणजे त्या ठिकाणी शाहरुख खानच्या एका सिनेमाचे शुटींग [कुछ कुछ होता है चे टायटल साँग] झाले होते. किल्ल्यावर जाण्यापूर्वी मोबाईल वर ते गाणे सर्वांनी पाहिले. नक्की कोणती ती जागा समजण्यासाठी. आहेत कि नाही हुशार! मी आणि मंजिरी ने थोडाच किल्ला पाहीला.व खाली येवून निवांत बसलो.कारण आता ४ दिवस सतत फिरून पाय खूपच दुखत होते.बाकी हे सर्व किल्ल्यावर निवांतपणे फिरत होते.किल्ल्याच्या ३ बाजूला पाणी होते.थोडीफार खरेदी करून आम्ही निघालो.

आता एका बोटीवर जायचे होते [डॉल्फिन सफारी]. या बोटीचे वैशिष्ठ म्हणजे ही बोट खूप दूरवर पाण्यात आत घेऊन जातात. सील मासे, डॉल्फिन, इतर मोठे मासे दिसतात.पण त्या दिवशी हवा खूपच खराब असल्याने आम्हाला फक्त सील मासेच दिसले. कसले ते गब्दुल असतात? मी म्हणू नये खर तर.....मधेच खडकावर शेवाल्यावर येवून बसले होते. चाहूल लागली आवाज झाला कि लगेच दुबकन पाण्यात जात होते.

डॉल्फिन मला बघायचा होता तो मात्र काही दिसला नाही.परत येताना बोटीचा जेवढा भाग वर दिसत होता तेवढाच खाली होता.खालच्या भागात बसून काचेतून खोलवर असलेल्या पाण वनस्पती, शेवाळ, छोटे मोठे मासे, खेकडे  सर्व काही दिसत होते.मी या आधी समुद्राचा तळ फक्त डिस्कव्हरी चॅनेल वरच पाहीला होता. आता मात्र प्रत्यक्ष बघताना गम्मत वाटत होती. मला ते बघताना "जीवो जीवस्य जीवनम" या संस्कृत सुभाशिताची आठवण झाली. 

खोल पाण्यात किती तरी वेळ बोट शांत उभी होती.पाणी अगदी रंगाने हिरवेगार पण शुद्ध दिसत होते.खूप मोठमोठ्या आकाराच्या आम्ही पाण वनस्पती पहिल्या,समुद्राचा तळ पाहीला. अगदी कायम लक्षात राहण्यासारखी ही बोट ट्रिप होती.




कुछ कुछ होता है चे टायटल साँग जे एलीन डोनानला शूट झाले:


No comments:

Post a Comment